Tuesday, November 18, 2025 09:55:36 PM

Trump Warns China: चीनने न्याय्य व्यापार करारावर सह्या कराव्यात, नाहीतर होईल मोठी अडचण; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा देत म्हटलं आहे की, न्याय्य व्यापार करार न झाल्यास 155% टॅरिफ लागू होईल.

trump warns china चीनने न्याय्य व्यापार करारावर सह्या कराव्यात नाहीतर होईल मोठी अडचण डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला थेट इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चीनला कठोर इशारा देत सांगितले की, “जर चीनने अमेरिकेसोबत व्यापार करण्यास नकार दिला, तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.” मात्र त्याचवेळी त्यांनी चीनसोबतच्या नातेसंबंधांबाबत आशावादही व्यक्त केला आणि “न्याय्य व्यापार करार” करण्याची इच्छा व्यक्त केली.

सोमवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “आम्ही चीनसोबत एक योग्य आणि न्याय्य करार करणार आहोत. मला चीनसोबत चांगले संबंध ठेवायचे आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे अतिशय उत्तम संबंध आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “दक्षिण कोरियाच्या दौऱ्यानंतर आमची भेट होईल. मला चीनला भेट देण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे आणि पुढील वर्षाच्या सुरुवातीला ते निश्चित होईल.”

दरम्यान, ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोर भूमिका घेताना सांगितले की, त्यांनी चीनवर आधीच 100% टॅरिफ लागू केला आहे. चीनने अमेरिकेचे ऐकले नाही, तर हा टॅरिफ दर 155% पर्यंत वाढवला जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला. ट्रम्प म्हणाले, “असं जर झालं, तर चीन मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. त्यामुळे चीनने न्याय्य करार मान्य करणे हाच त्यांच्यासाठी एकमेव पर्याय ठरेल.” आता एक नोव्हेंबरपासून चीनवर 100% की 155% टॅरिफ लागू होतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: Ayatollah Khamenei on Trump: इराणचे नेते खामेनेई यांनी अमेरिकेवर आणि ट्रम्प यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले 'इराणवर हल्ल्याचे स्वप्न पाहू नका'

ट्रम्प यांनी पुढे स्पष्ट केले की, “जर चीनने आमच्यासोबत व्यापार केला नाही, तर त्यांच्यासाठी परिस्थिती खूप कठीण होईल. मला खरंच वाटतं की ते अडचणीत येतील. मला त्यांचं वाईट व्हावं असं नाही वाटत, पण दोन्ही देशांनी एकत्र प्रगती केली पाहिजे. हे एकमेकांना फायदेशीर असलेलं द्विपक्षीय नातं आहे.”

तैवानच्या प्रश्नावर बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, “चीनचा सध्या तैवानवर हल्ला करण्याचा कोणताही विचार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, “ही बाब पुढील आठवड्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या आर्थिक परिषदेत शी जिनपिंग यांच्यासोबतच्या चर्चेत उपस्थित केली जाईल.” इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेची लष्करी उपस्थिती पुरेशी आहे का, असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प म्हणाले, “चीनला असं काही करायचं नाही.”

दरम्यान, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रियर यांनीही चीनविरोधात कठोर भूमिका घेतली आणि स्पष्ट इशारा दिला की, “अमेरिकन उद्योगांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवर चीनकडून होत असलेल्या आर्थिक दबावाला वॉशिंग्टन प्रत्युत्तर देईल.”

काही दिवस अगोदरच ट्रम्प यांनी म्हटले होते की, “अमेरिका चीनवरील काही शुल्क कमी करू शकते, पण त्यासाठी चीनने अमेरिकेच्या काही अटी मान्य कराव्या लागतील.” यात अमेरिकन सोयाबीनची खरेदी वाढवणे, दुर्मिळ खनिजांवरील निर्बंध हटवणे आणि सुरक्षेशी संबंधित इतर मुद्द्यांचा समावेश आहे.

अमेरिका आणि चीनमधील पुढील व्यापार चर्चा लवकरच होणार असून, दोन्ही देशांदरम्यानचे संबंध पुन्हा स्थिर करण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा: Diwali Muhurat Trading 2025: दिवाळी मुहूर्ताच्या विशेष ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजी; सेन्सेक्स 250 अंकांनी वाढला


सम्बन्धित सामग्री