Year Ender 2025: ‘वाद’ हा शब्द बॉलीवूडसाठी नवा नाही. मात्र 2025 या वर्षात चित्रपटांपेक्षा जास्त चर्चा झाली ती कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याची, कामाच्या अटींची, कायदेशीर संघर्षांची आणि सोशल मीडियावर पेटलेल्या वादांची. वर्षभर बॉलीवूड कधी धक्कादायक घटनांमुळे, कधी वक्तव्यांमुळे, तर कधी अचानक उभ्या राहिलेल्या गॉसिप्समुळे मथळ्यांमध्ये राहिलं. प्रेक्षकांनी जरी चित्रपटांकडून अपेक्षा ठेवल्या असल्या, तरी बातम्यांमध्ये झळकले ते या दहा मोठ्या कारणांमुळे.
1) सैफ अली खानवरील हल्ला: वर्षाची धक्कादायक सुरुवात
2025 च्या सुरुवातीलाच बॉलीवूड हादरलं. अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी कथित हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या घटनेत सैफ गंभीर जखमी झाले, त्यांना मणक्याला दुखापत झाल्याचंही सांगितलं गेलं. या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीत अस्वस्थता पसरली.
या प्रकरणानंतर सैफ आणि करिना कपूर खान यांनी पापाराझींना उद्देशून सार्वजनिकरित्या आपली भूमिका मांडली. “आमच्या मुलांचे फोटो काढणं थांबवा,” अशी स्पष्ट मागणी करत त्यांनी सेलिब्रिटी प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. यामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले. एक समर्थन करणारा, तर दुसरा ‘सेलिब्रिटी असाल तर प्रसिद्धी सहन करावीच लागते’ असं म्हणणारा.
2) संजय कपूर यांच्या निधनानंतर वारसा वाद
करिश्मा कपूर यांचे माजी पती संजय कपूर यांच्या अचानक निधनानंतर दु:खाला फारसा वेळ मिळाला नाही. त्यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवरून सुरू झालेल्या वारसा वादाने मोठा गदारोळ माजवला. संजय कपूर यांची आई, सध्याची पत्नी आणि करिश्मासोबतच्या विवाहातील मुलं सगळेच या संपत्तीच्या वाटणीसाठी चर्चेत आले.
हा वाद केवळ कौटुंबिक मर्यादेत न राहता सार्वजनिक चर्चेचा विषय ठरला. ‘सेलिब्रिटींच्या आयुष्यात गोपनीयता उरली आहे का?’ असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला.
3) ‘हेरा फेरी 3’ मधील तणाव
बॉलीवूडची सर्वात लोकप्रिय विनोदी फ्रँचायझी ‘हेरा फेरी’ पुन्हा चर्चेत आली, पण यावेळी चित्रपटामुळे नाही तर कलाकारांमधील मतभेदांमुळे. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीमध्ये शूटिंगदरम्यान तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या.
परेश रावल यांनी सेट सोडल्याची चर्चा, अक्षय कुमार यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारल्याच्या बातम्या आणि चाहत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता—या सगळ्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गोंधळ उडाला. अखेर सर्व गैरसमज दूर झाले आणि परेश रावल पुन्हा चित्रपटात परतले, पण या वादाने ‘आयकॉनिक फ्रँचायझीही सुरक्षित नाही’ हे दाखवून दिलं.
4) दीपिका पदुकोण आणि 8 तासांचा वाद
2025 मधील सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे दीपिका पदुकोणचा 8 तासांच्या कामाच्या अटीवरून सुरू झालेला वाद. आई झाल्यानंतर दीपिकाने चित्रपट सेटवर मर्यादित कामाचे तास हवेत अशी मागणी केल्याचं समोर आलं. काही रिपोर्ट्सनुसार, या अटीमुळे तिला काही मोठे प्रोजेक्ट्स गमवावे लागले.
या प्रकरणाने संपूर्ण इंडस्ट्रीत चर्चा पेटवली. काही कलाकार आणि तज्ञांनी दीपिकाच्या भूमिकेला पाठिंबा दिला, तर काहींनी ‘चित्रपटसृष्टीत हे शक्य नाही’ असं मत मांडलं. दीपिकाने मात्र पुरुष कलाकारांवर वेगळे नियम लागू होतात का, असा सवाल उपस्थित करत हा मुद्दा अधिक व्यापक केला.
5) पापाराझी विरुद्ध जया बच्चन
जया बच्चन आणि पापाराझी यांचं नातं नेहमीच तणावपूर्ण राहिलं आहे. 2025 मध्येही हे चित्र बदललं नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात जया बच्चन यांनी पापाराझींच्या वागणुकीवर आणि व्यावसायिकतेवर प्रश्न उपस्थित केले.
त्यांची वक्तव्यं सोशल मीडियावर व्हायरल झाली. काहींनी त्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली. या वादामुळे ‘सेलिब्रिटी प्रायव्हसी विरुद्ध मीडिया स्वातंत्र्य’ हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
6) रणवीर सिंगचा ‘कांतारा’ संदर्भातील वाद
IFFI गोवा दरम्यान रणवीर सिंगने ‘कांतारा’ चित्रपटातील एका दृश्याचा संदर्भ देताना केलेलं वक्तव्य त्याला अडचणीत आणणारं ठरलं. पवित्र दैव परंपरेबद्दल चुकीचा उल्लेख केल्याचा आरोप त्याच्यावर झाला.
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार ऋषभ शेट्टी यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर प्रचंड संताप उसळला. अखेर रणवीरने सार्वजनिक माफी मागितली, पण तोपर्यंत हा वाद राष्ट्रीय पातळीवर पोहोचला होता.
7) स्मृती मंधानाचं लग्न आणि सोशल मीडिया गोंधळ
क्रिकेटर स्मृती मंधाना आणि गायक पल्लव मुचाळ यांचं लग्न पुढे ढकलल्याची बातमी सुरुवातीला सहानुभूतीने पाहिली गेली. मात्र काही दिवसांतच कथित चॅट्स, अफवा आणि सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे प्रकरण वेगळ्याच वळणावर गेलं.
इन्स्टाग्रामवर फिरणाऱ्या चर्चांमुळे दोघांच्याही खासगी आयुष्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अखेर डिसेंबरच्या सुरुवातीला लग्न रद्द झाल्याची घोषणा झाली, पण कारण सांगितलं गेलं नाही.
8) पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी
एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. याचा थेट फटका काही चित्रपटांना बसला. फवाद खानचा कमबॅक चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
या निर्णयामुळे देशभरात चर्चा झाली. काहींनी या बंदीचं समर्थन केलं, तर काहींनी कलेला सीमा नसतात असं मत मांडलं. सहकलाकारांनाही सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला.
9) आर्यन खान: रील विरुद्ध रिअल लाइफ
आर्यन खानच्या दिग्दर्शनातील वेब सिरीजवरून कायदेशीर वाद निर्माण झाला. एका माजी अधिकाऱ्याने मालिकेतील पात्रावरून बदनामीचा आरोप केला. या प्रकरणामुळे ‘क्रिएटिव्ह फ्रीडम’ आणि ‘जबाबदारी’ यामधली सीमा पुन्हा चर्चेत आली.
10) उदित नारायणचा किस वाद
90च्या दशकातील लोकप्रिय गायक उदित नारायण एका कॉन्सर्टदरम्यान महिला चाहत्यांना किस केल्यामुळे वादात सापडले. काहींनी याला प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग म्हटलं, तर अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर या घटनेवरून मोठी चर्चा झाली.
2025 वादांनी भरलेलं वर्ष
2025 हे वर्ष बॉलीवूडसाठी केवळ सिनेमांचं नव्हे, तर समाजमाध्यमांच्या युगात वाढलेल्या चर्चांचं वर्ष ठरलं. प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक कृती क्षणार्धात व्हायरल होऊ लागली. या सगळ्या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली बॉलीवूड केवळ मनोरंजन उद्योग राहिलेला नाही, तर तो समाजातील बदल, वाद आणि चर्चांचा आरसा बनला आहे.