गोंदिया जिल्ह्यातील सोन्याच्या दागिन्यांसाठी शेजाऱ्यानेच एका 81 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे 81 वर्षीय कुसुमबाई चैतराम कापगते यांची हत्या करून सोन्याचे दागिने लुटल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया आणि डुग्गीपार पोलिसांनी उलगडा केला.
1 ते 2 सप्टेंबर 2026 दरम्यान घरात एकट्या असताना कुसुमबाई यांची हत्या करण्यात आली. दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची अंगठी आणि सोन्याचे मणी असलेली काळी पोच असा 1 लाख 32 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला. 2 सप्टेंबर रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही, फिंगरप्रिंट, श्वानपथक, प्रत्यक्षदर्शीची माहिती आणि मोबाईल डेटाचे विश्लेषण करूनही सुरुवातीला ठोस पुरावा मिळाला नाही.
त्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांचा डीएनए आरोपीच्या नमुन्याशी जुळला. यानंतर घराशेजारी राहणाऱ्या विलास किशन मेश्राम (वय 42) याला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. समोर आलेल्या महितीनुसार, घरात सापडलेले सुपारीचे तुकडे न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, नागपूर येथे पाठविण्यात आले आणि गावातील चार संशथितांचे रक्तनमुने तपासले गेले.
तांत्रिक तपासात विलास मेश्राम आर्थिक संकटात व कर्जबाजारी असल्याचे तसेच त्याने सडक अर्जुनी, सौंदड आणि भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील सराफा व्यावसायिकांशी मध्यस्थांमार्फत संपर्क साधल्याचे समोर आले. डीएनए अहवाल जुळल्यानंतर 9 ऑक्टोबरच्या संध्याकाळी चौकशीत त्यानेच दागिन्यांसाठी कुसुमबाई चैतराम कापगते यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याची कार्यवाही सुरू आहे.