छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षणिक सुख, जबाबदारीचा अभाव आणि लिव्ह-इन रिलेशनशिपच्या संबंधातून जन्माला आलेल्या अवघ्या एका महिन्याच्या निष्पाप बालकाचा त्याच्याच जन्मदात्या आईने 1 लाख 20 हजार रुपयांत सौदा करून त्याची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली आहे. हा संतापजनक प्रकार मुकुंदवाडीत उघडकीस आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेत स्वतः जन्मदातेच या लाजीरवाण्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. मुकुंदवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर सरकारतर्फे फिर्यादी होऊन जन्मदात्यांसह खरेदीदार मायलेकींवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.
बाळाची 36 वर्षीय आई गेली काही वर्षे मुंबईत वास्तव्यास होती. पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती तिच्या पहिल्या मुलीला सोडून, तीन वर्षापासून 34 वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तिचा प्रियकर देखील मुलगा व पत्नीला सोडून राहतो. तो दारूच्या आहारी गेला होता. 36 वर्षीय महिलेने 5 जुलै रोजी घाटी रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला.
रुग्णालयातच तिची ओळख 65 वर्षीय कौशल्या बारकू पवार या स्वयंपाक काम करणाऱ्या महिलेसोबत झाली. तिने ‘तुझा नवरा दारू पितो, तो तुझा आणि बाळाचा सांभाळ कसा करणार?’ असा तिच्या मनात संशय निर्माण केला. ‘माझी मुलगी सीमा अनिल रेशवाल बाळ विकत घेते, ते बाळ मला दे, आम्ही त्याचा नीट सांभाळ करू’ असे सांगून वृद्धेने दोघांना जाळ्यात ओढले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी जन्मदात्या आईसह बाळाच्या खरेदीत सहभागी असलेल्या चौघांना अटक केली असून, या धक्कादायक प्रकाराचा पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.