लोहगडावरील केतन हत्या प्रकरण ताजे असतानाच आता कर्नाटकातील बेंगळुरू येथील शिवगंगा टेकडीवरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्रेकिंगला जातो असं सांगून घरा बाहेर पडलेला 31 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर अचानक बेपत्ता झाला आहे. यावेळी बेपत्ता झालेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन आणि इतर अधिकारी सज्ज झाले असून आपलं शर्थीचं काम ते बजावत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अद्वैत उपाध्याय असे बेपत्ता झालेल्या 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे.
अद्वैत हा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो मूळचा मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. अद्वैत हा आयआयटी मधून सायबर सिक्युरिटीत पदव्युत्तर पदवी घेतलेला माजी विद्यार्थी असून तो बेंगळुरूतील व्हाईटफील्ड येथील एका फायनान्स कंपनीत कार्यरत होता. तर येत्या जानेवारी महिन्यात त्याचा विवाह प्राप्ती चौहान हिच्यासोबत निश्चित झाला होता. दरम्यान 7 ऑगस्ट रोजी त्याने एक बाईक भाड्याने घेतली आणि तो बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील शिवगंगे टेकडीवर ट्रेकिंगला जात असल्याचे त्याने त्याच्या होणाऱ्या पत्नीला सांगितले. दुपारपर्यंत तो परतणे अपेक्षित होते मात्र तो परतलाच नाही. त्यात त्याचा मोबाईलही बंद झाल्याने कुटुंबीयांना त्याच्यासोबत कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या कुटुंबीयांनी मंगेतराने कडुगोडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
त्यानंतर त्वरित बेपत्ता झालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलीस, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि वन विभागाचे 100 हून अधिक कर्मचारी टेकडीच्या अत्यंत दुर्गम आणि दाट जंगल भागात अहोरात्र मोहीम राबवण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना सकाळी साडेसातच्या सुमारास अद्वैत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचून ट्रेकिंग सुरू करताना दिसला. तर शोध घेत असताना अद्वैतने भाड्याने घेतलेली बाईक टेकडीच्या पायथ्याशीच आढळून आली आहे.
तर अद्वैतचा कुठेही पत्ता लागत नसल्यामुळे पोलिसांनी नेलमंगला आणि डोब्बासपेट पोलिसांना सतर्क करून तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. यावेळी पोलिसांना अद्वैतच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कुनिगल रोडवरील कुदुरुजवळ दाखवत होते. हे लोकेशन शिवगंगेच्या सामान्य ट्रेकिंग रूटपेक्षा वेगळ्या दिशेला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अद्वैतच्या घरातून मिळालेल्या लॅपटॉपची ब्राऊजिंग हिस्ट्री तपासली असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.
लॅपटॉपमध्ये शिवगंगे टेकडी, त्याचा परिसर आणि शांतला ड्रॉपबाबत सर्च करण्यात आले होते. तर बेंगळुरू आणि परिसरातील 'आत्महत्येच्या जागां'बाबतही सर्च हिस्ट्री समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सध्या शोधमोहीम ही शिवगंगे टेकडीवरील सर्वात धोकादायक भाग मानल्या जाणाऱ्या 'शांतला ड्रॉप'वर केंद्रित करण्यात आली आहे. हा भाग अतिशय तीव्र चढाचा आणि खडकाळ असल्याने तिथे पोहोचणे बचाव पथकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मात्र, पोलिसांनी या माहितीवरून कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नसून अद्वैतचा शोध पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घेत आहेत.