मुंबई : सिनेक्षेत्रातील मंडळी गेल्या काही दिवसांपासून अज्ञात शूटर्सच्या रडारवर असल्याचे पाहायला मिळाले आहे. सलमान खान, रोहित शेट्टी यांना टार्गेट केल्यानंतर काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर या कटामागील सूत्रधार शोधण्याचे काम मुंबई पोलिसांनी वेगाने सुरू केले. या घटनेतील ११ आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, शूटर्सकडून दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. यापूर्वी सलमान खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन हे शूटर्सच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले होते. तर आता अभिनेता आमिर खानदेखील त्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
हेही वाचा : अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग; लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
टायगर श्रॉफवरील गोळीबारापूर्वी अभिनेता आमिर खान कथित शूटर्सचे मूळ लक्ष्य होते. टायगर श्रॉफपूर्वी आमिर खानला लक्ष्य करण्याचा कथित कट शूटर्सनी रचला होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी सप्टेंबरमध्ये आमिर खानच्या घराजवळ 3 वेळा रेकी केली होती. आमिर खानपर्यंत पोहोचणे कठीण वाटल्याने कथित कटात टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय शूटर्सनी घेतला. 20 सप्टेंबरला हरियाणातून आलेले कथित आरोपी मुंबईत दाखल झाले. आरोपी जवळपास एक महिना मुंबईत राहून विविध ठिकाणी फिरत होते. सप्टेंबरमध्ये आमिर खानच्या निवासस्थानाच्या परिसरात किमान 3 वेळा रेकी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी वांद्रे पूर्व परिसरातील लॉजमध्ये राहिले होते. आमिर खान शूटिंगसाठी बाहेर असायचा किंवा अनेक दिवस घराबाहेर पडत नसे. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपींनी कथितपणे टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. टायगर श्रॉफ जुहूतील पुष्पा नरसी पार्कमध्ये दर रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी येत असल्याची माहिती आरोपींनी मिळवली होती. आमिर खानला जुलैमध्ये कथित बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्याचा आणि या प्रकरणाचा त्या धमकीशी संबंध असण्याचा पोलिसांना संशय आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.