अहिल्यानगर शहरात नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. पाईपलाईन रोडवरील श्री तुळजाभवानी मंदिराजवळ रस्त्यावर उभारण्यात आलेला लोखंडी मंडप अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत एक लहान मूल आणि एक वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – कुर्ल्यात लिफ्टचा थरार! केबल तुटली, लिफ्ट सहा मजले खाली; 14 जणांचा जीव तीन तास टांगणीला
मिळालेल्या माहितीनुसार, मंडप उभारताना कामगारांनी हलगर्जीपणा केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भर रस्त्यात उभारलेला मंडप योग्यरित्या न बांधल्याने तो कोसळला.
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मंडप आणि कमानींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेची परवानगी न घेताच असे मंडप उभारले जात असल्याचा आरोपही होत आहे.
भविष्यात अशी दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व मंडपांची तातडीने सुरक्षा तपासणी करावी, दोषींवर कडक कारवाई करावी आणि जखमींच्या उपचाराची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी अहिल्यानगरकरांकडून केली जात आहे.