अहिल्यानगर शहरातील वाडिया पार्क परिसरात कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळल्याची माहिती समोर आली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना काही शाळकरी मुलांमध्ये वाद सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच काही मुले घटनास्थळावरून पळून गेली. यावेळी त्यांच्या मागे एक दुचाकी राहिली होती. पोलिसांनी संशय आल्याने दुचाकीची तपासणी केली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेल्या स्कूल बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता आढळून आला. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांऐवजी घातक हत्यार आढळल्याने पोलिसांनी तात्काळ कोयता जप्त केला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
या प्रकरणात पोलिसांनी दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून, बाल संरक्षण कायद्यानुसार नोंद करण्यात आली आहे. या मुलांकडे हे हत्यार कसे आले आणि त्याचा नेमका वापर कशासाठी केला जाणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांना विनापरवाना दुचाकी किंवा इतर वाहने देणाऱ्या पालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी घटना टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.