तमाशाचा नाद, कर्जाचा डोंगर अन् सोन्याची लालसा! माजी सरपंचासह वृद्ध महिलेच्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं

बारामतीच्या शेरेवाडीत दोन वृद्ध महिलांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा आरोप असून विकास लडकतला ताब्यात घेण्यात आले आहे

तमाशाचा नाद, कर्जाचा डोंगर अन् सोन्याची लालसा! माजी सरपंचासह वृद्ध महिलेच्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं
Baramati Crime

बारामती: बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे माजी महिला सरपंचासह महिलेची गळा चिरून हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्यानंतर सोन्याचे दागिने लुटून दोन्ही महिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

कृष्णाबाई लडकत आणि इंदुबाई लडकत अशी हत्या झालेल्या दोन्ही वृद्ध महिलांची नावे आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्येचा नेमका उद्देश काय, आरोपी कोण आणि या हत्याकांडामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू होता.

चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने चोरी करण्याच्या उद्देशाने दोन्ही वृद्ध महिला राहत असलेल्या घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने लुटल्यानंतर हा प्रकार उघडकीस येऊ नये, यासाठी दोन्ही महिलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन्ही महिलांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाला वेग दिला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तपास पथके तयार केली होती. परिसरातील माहिती, तांत्रिक तपास आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

विकास लडकत पोलिसांच्या ताब्यात

या तपासादरम्यान विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडून सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या हत्याकांडामागे केवळ चोरीचा उद्देश होता की त्यामागे अन्य काही कारण आहे, याचाही तपास केला जात आहे. आरोपीने गुन्हा नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीत केला, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

आणखी कुणाचा सहभाग आहे का?

दोन वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांडाचा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असला, तरी या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास बारामती पोलीस करत आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील इतर बाबीही समोर येण्याची शक्यता आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासातून दोन वृद्ध महिलांचा जीव गेल्याने शेरेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपासातून हत्याकांडामागील संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number