ठाणे: भिवंडी तालुक्यातील शेडगाव परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा अखेर पोलिसांनी छडा लावला आहे. कामावर जात असताना 40 वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावानेच ही संपूर्ण योजना आखल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.
12 मे रोजी सकाळच्या सुमारास शेडगाव येथील परेश पाटील हे दुचाकीवरून वसईच्या दिशेने कामासाठी निघाले होते. वाशिंद-अंबाडी रोडवरील गाव तलावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
घटनेनंतर गणेशपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला हा प्रकार लुटमारीचा किंवा जुन्या वैरातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला.
या तपासादरम्यान पोलिसांनी जवळपास 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यातून संशयित वाहनाचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील केळवा परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण कटाचा उलगडा झाला.
तपासात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेमागे मृत परेश पाटील यांचा सख्खा भाऊ नरेश पाटील याचाच हात असल्याचं समोर आलं. नरेशनेच काही गुंडांना पैशांचे आमिष दाखवत भावाला संपवण्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही भावांमध्ये सामायिक शेती आणि घराच्या मालकीवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. मोठा भाऊ परेश याने जमीन आणि घर स्वतःच्या नावावर केल्याचा राग नरेशच्या मनात होता. याच रागातून त्याने दहा लाख रुपयांची सुपारी देऊन भावाला रस्त्यात अडवून मारण्याची योजना आखली होती.
गणेशपुरी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत अवघ्या काही दिवसांत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. या प्रकरणात नरेश पाटीलसह आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
सख्ख्या भावानेच मालमत्तेच्या वादातून अशा प्रकारे कट रचल्याची घटना समोर आल्याने भिवंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पैशासाठी आणि जमिनीच्या लोभातून नातेसंबंध किती टोकाला जाऊ शकतात, याचं हे धक्कादायक उदाहरण मानलं जात आहे.