अयोध्या : उत्तर प्रदेशात अयोध्येतील एका गावात 22 वर्षीय दलित तरुणीचा हात-पाय बांधलेला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. ही तरुणी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या प्रकरणी खासदार राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांनी राज्यातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार जोरदार टीका केली आहे.
पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलीसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी महिलेचा योग्य पद्धतीने शोध घेतला नाही असा कुटुंबियांचा दावा आहे. आता तिची हत्या करण्यात आली आहे. तसेच, तिचे डोळे काढण्यात आल्याचा आणि तिच्या शरीरावर गंभीर जखमा आणि फ्रॅक्चर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
हेही वाचा - Budget 2025 : 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य, संशोधनासाठी इतकी तरतूद
'दलित, गरीब आणि मागास लोकांच्या व्यथा सरकारला ऐकू येत नाहीत. मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचे नातेवाईक पोलिसांकडे गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. अशा प्रकारचे अमानवीय क्रौर्य दर्शवणारे गुन्हे घडत आहेत. आदिवासी, दलितांवर अत्याचार होत आहेत. हे सर्व भाजप सरकारचे 'जंगलराज' आहे,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे.
राहुल यांनी या घटनेची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, मृत तरुणीच्या घरच्यांची तक्रार ऐकून न घेणाऱ्या आणि तिचा शोध घेण्याची टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, आणखी किती मुलींना अशा अत्याचारांना सामोरे जावे लागेल, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
हेही वाचा - Budget 2025 : कर्करोगाची औषधे स्वस्त होणार, 10 हजार वैद्यकीय जागा वाढणार
घटनेची माहिती मिळताच अयोध्या(फैजाबाद)चे खासदार अवधेश प्रसाद हे पत्रकारांसमोर दु:ख व्यक्त केले. दरम्यान खासदार अवधेश प्रसाद यांचा माध्यम प्रतिनिधींसमोर मोठ्याने रडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
दरम्यान, अयोध्या एसएसपी राजकरण नय्यर यांनी माहिती दिली की, पोलिसांनी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. नय्यर म्हणाले, "31 जानेवारी 2025 ला दर्शन नगर चौकी येथे माहिती मिळाली की, 30 जानेवारीच्या रात्री ही तरुणी तिच्या बहिणीसोबत झोपली होती. परंतु, दुसऱ्या दिवशी सकाळी बहिणीला जाग आली, तेव्हा मुलगी बेपत्ता होती. तिने पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मुलीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली. आज सकाळी तिचा मृतदेह शेतात सापडला आहे. वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक्स टीम घटनास्थळी पोहोचली आणि वैज्ञानिक पुरावे गोळा केले.
"प्रथमदर्शनी असे दिसते की, ही हत्या घटनास्थळी झाली नाही, मुलीची हत्या दुसरीकडे कुठेतरी करण्यात आली होती आणि तिचा मृतदेह शेतात फेकण्यात आला होता. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल आणि दोषींना जलदगती न्यायालयाद्वारे कठोर शिक्षा दिली जाईल. सर्व पथके त्या दिशेने काम करत आहेत," असे ते म्हणाले.