नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्राला या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा होत्या. या क्षेत्रात सरकारकडून केला जाणारा खर्च वाढवण्याबद्दल बोलले जात होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी वैद्यकीय शिक्षणासंबंधीच्या गरजा पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. आरोग्य क्षेत्राला काय मिळाले आहे ते जाणून घेऊ.
अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला काय मिळाले?
1. डे केअर कॅन्सर सेंटर
येत्या 3 वर्षांत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्याची घोषणा सरकारने केली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात अशी 200 केंद्रे उघडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याचा फायदा महागडे कर्करोग उपचार घेऊ न शकणाऱ्या अनेक गरीब आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना होऊ शकतो. यामुळे कर्करोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
- 3 वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोग केंद्रे उघडली जातील.
- कर्करोगाशी संबंधित औषधे स्वस्त होतील
- ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लोकांना मेडिकल कार्ड मिळतील.
- जिल्हा रुग्णालयांमध्ये डे केअर सेंटर उघडले जातील.
- वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाईल
- वैद्यकीय उपकरणे स्वस्त होतील.
2. वैद्यकीय क्षेत्रात 10 हजार जागा वाढणार
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10,000 जागा वाढवणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. पुढील पाच वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमधील 75,000 जागा वाढवल्या जातील. गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी देशात नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एमबीबीएसच्या जागा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
3. देशभरातील आयआयटींसाठी ही तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीब व मध्यमर्गीयांसाठी अनेक योजना सादर केल्या. यासह त्यांनी शिक्षण क्षेत्रात देशभरातील 23 आयआयटींमध्ये एकूण 6,500 जागा वाढवणार असल्याचं जाहीर केलं. दहा वर्षांपूर्वी आयआयटीमधील एकूण जागांची संध्या 65000 होती. ती आता 1.35 लाखांवर पोहोचली आहे. मागील दहा वर्षांत झालेली ही 100 टक्के वाढ आहे. याशिवाय, 2014 नंतर सुरू करण्यात आलेल्या नवीन पाच आयआयटींमध्ये या नवीन येणाऱ्या 6500 विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधाही देण्यात येतील. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील, असे अर्थमंत्री म्हणाल्या.