बुलढाणा : दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांसमोरील आर्थिक संकट किती गंभीर झालं आहे, याची जाणीव करून देणारी धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात समोर आली आहे. चोंडी गावातील तरुण शेतकरी शंकर भारसाकडे यांनी टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. कर्जाचा वाढता डोंगर आणि हातातून गेलेलं खरिपाचं पीक यामुळे ते मोठ्या आर्थिक विवंचनेत असल्याचं सांगितलं जात आहे.
एक वावर विकला, दुसरा गहाण टाकला
शंकर भारसाकडे यांनी कर्ज फेडण्यासाठी आपली जमीन विकल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर आणखी एक वावर गहाण ठेवण्यात आला होता. कुटुंबाच्या अडचणी दूर करण्यासाठी पत्नीचं मंगळसूत्रही गहाण ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एवढे प्रयत्न करूनही कर्जाचा भार कमी झाला नाही.
कर्ज फेडण्याची चिंता आणि शेतीतून उत्पन्नाची आशा संपल्याने शंकर भारसाकडे हे मानसिक आणि आर्थिक तणावात असल्याचं सांगण्यात येत आहे.
सहा ओळींच्या चिठ्ठीत मांडली व्यथा
आपल्या आयुष्याच्या अखेरीस शंकर भारसाकडे यांनी एका कागदावर केवळ सहा ओळी लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या आर्थिक परिस्थितीचा आणि कर्जाच्या संकटाचा उल्लेख केल्याचं सांगितलं जात आहे. कर्ज फेडण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातूनही परिस्थिती न सुधारल्याची व्यथा त्यांनी मांडल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.
साठ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा
संग्रामपूर तालुक्यात यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांची मोठी निराशा केली आहे. तब्बल साठ दिवसांपासून पावसाचा पत्ता नसल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक पावसाअभावी वाया गेल्याचं चित्र आहे.
चोंडी गावातील या घटनेमुळे दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि शेतीवरील वाढता खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट पुन्हा अधोरेखित झालं आहे. कुटुंबाचा दैनंदिन खर्च, शेतीवरील कर्ज आणि पुढील हंगामाची चिंता अशा अनेक प्रश्नांनी शेतकरी कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आधार आणि मदत मिळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.