छत्रपती संभाजीनगर : मैत्रिणींसोबत पैसे उडवून मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या तीन तरुणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीच्या तब्बल तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. संजय विनोद जाधवर, सुशांत मंगेश भालेराव आणि युवराज विष्णू चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिसांच्या विशेष पथकातील कर्मचारी पाम हॉटेल परिसरात गस्त घालत होते. यावेळी मोपेडवरून तिघेजण ट्रिपल सीट जाताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
चौकशीदरम्यान तिघांनी आपण ज्या मोपेडवरून प्रवास करत होतो, ती क्रांती चौक परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडे अधिक कसून चौकशी केली. यावेळी टाऊन सेंटर परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरल्याचेही तपासात समोर आले.दुचाकी चोरी करण्याची आरोपींची पद्धतही पोलिसांच्या तपासात उघड झाली. दुचाकीचे हँडल लॉक तोडण्यासाठी हे आरोपी थेट पायाने हँडलवर जोरदार प्रहार करत होते. लॉक तुटल्यानंतर वायर डायरेक्ट करून दुचाकी सुरू केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर चोरीची दुचाकी घेऊन ते पसार होत होते.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीतून चोरीच्या तीन दुचाकींचा तपास लागला. पोलिसांनी या तिन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. मैत्रिणींसोबत मौजमजा करण्यासाठी आणि त्यासाठी पैसे खर्च करण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरी केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.