‘लगेच सिझेरियन करा’ डॉक्टरांचा सल्ला; सासरच्यांनी पैशांसाठी अडवलं, 9 महिन्यांच्या गर्भवतीचा तडफडून मृत्यू

पैठण तालुक्यात नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा पोटातील बाळासह मृत्यू झाला.

‘लगेच सिझेरियन करा’ डॉक्टरांचा सल्ला; सासरच्यांनी पैशांसाठी अडवलं, 9 महिन्यांच्या गर्भवतीचा तडफडून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिच्यासह पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विहामांडवा येथे ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंदेविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर रोजी स्वाती यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच बाळाच्या गळ्याभोवती नाळ वेढल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महिलेची प्रसूती तातडीने सिझेरियन पद्धतीने करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात येते.

मात्र, सिझेरियन आणि पुढील उपचारांचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, स्वाती यांच्या माहेरच्यांनी उपचारांचा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. तरीही त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचा आरोप आहे.

दरम्यान, उपचाराअभावी स्वाती यांची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली. अखेर २५ सप्टेंबर रोजी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वाती आणि त्यांच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर स्वाती यांच्या कुटुंबीयांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या, सर्व रा. विहामांडवा, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलीस चौकशी करत असून, नेमक्या परिस्थितीचा तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number