छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्यावर 11 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने आक्रमक आंदोलन केले आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. अंगोमचा बिमोल ओकेइजाम यांच्याविरोधात 11 विद्यार्थिनींनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार उघडकीस येताच देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोपी खासदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असून, पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळावा यासाठी भाजपने आवाज उठवला आहे.
राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारून निषेध
आंदोलनादरम्यान भाजपा कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. संतप्त पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला. तसेच खासदार डॉ. अंगोमचा बिमोल यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि त्यांना पक्षातून बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
काँग्रेसने अद्याप या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी, भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याची रणनीती आखली आहे. एका लोकप्रतिनिधीकडूनच असे कृत्य घडणे हे अत्यंत लाजिरवाणे असून, काँग्रेसने या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी, असे आवाहन आंदोलकांनी केले आहे.