मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर उपलब्ध असलेल्या मोफत सार्वजनिक Wi-Fi वापरणाऱ्या प्रवाशांसाठी धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वजनिक Wi-Fi चा वापर केल्यानंतर एका व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मालवेअर शिरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्यानंतर काही मिनिटांतच त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक इंटरनेट सेवा वापरताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने CSMT स्थानकावरील मोफत Wi-Fi सेवा वापरली होती. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद APK फाईल आल्याचे समोर आले. ही फाईल RTO चलनाशी संबंधित असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. ती फाईल विश्वासार्ह वाटल्याने संबंधित व्यक्तीने ती डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल केली.
सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात, अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईलमध्ये मालवेअर सक्रिय झाल्याचा संशय आहे. या मालवेअरने मोबाईलमधील संवेदनशील माहिती, बँकिंगशी संबंधित तपशील आणि इतर महत्त्वाचा डेटा मिळवल्याची शक्यता तपासली जात आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित APK फाईल पीडिताच्या मोबाईलमधील संपर्क यादीतील इतर व्यक्तींनाही आपोआप पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर अवघ्या 28 मिनिटांच्या कालावधीत पीडिताच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल 4,27,264 रकमेचे पाच अनधिकृत व्यवहार करण्यात आले. बँकेच्या सुरक्षा प्रणालीने संशयास्पद व्यवहार ओळखल्यानंतर संबंधित कार्ड तातडीने ब्लॉक करण्यात आले. त्यामुळे पुढील आर्थिक नुकसान टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर पीडिताने राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार दाखल केली. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सायबर तज्ज्ञ आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा हल्ला सार्वजनिक Wi-Fi मुळे झाला, बनावट Wi-Fi हॉटस्पॉटचा वापर करण्यात आला होता की इतर कोणत्या माध्यमातून मालवेअर मोबाईलमध्ये पोहोचले, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक Wi-Fi वापरताना आर्थिक व्यवहार करणे शक्यतो टाळावे. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या APK फाईल्स किंवा लिंकवर क्लिक करू नये. कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी ते अधिकृत स्रोतावरूनच डाउनलोड करावे आणि त्याची सत्यता पडताळावी. मोबाईलमध्ये नियमित सुरक्षा अपडेट्स आणि अँटीव्हायरसचा वापर केल्यास अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते.