Duronto Express Stone Pelting: बायकोशी झालेल्या वादाच्या रागातून नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसवर (Duronto Express) तुफान दगडफेक करणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) शिताफीने अटक केली आहे. नरेंद्रकुमार सिरसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. नागपुरात तो बांधकाम क्षेत्राशी संबंधित इस्त्री आणि मजुरीची कामे करतो. कौटुंबिक कलहातून आलेल्या रागाच्या भरातच आपण धावत्या ट्रेनवर दगडफेक केल्याची कबुली आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली आहे.
वर्ध्याजवळील बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरात घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर वर्धा जिल्ह्यातील बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरात अचानक दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे ट्रेनमधील प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे मालमत्तेचे नुकसान झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला.
हेही वाचा – ‘लगेच सिझेरियन करा’ डॉक्टरांचा सल्ला; सासरच्यांनी पैशांसाठी अडवलं, 9 महिन्यांच्या गर्भवतीचा तडफडून मृत्यू
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आले आरोपीचे कृत्य
तपासादरम्यान आरपीएफच्या पथकाने बोरखेडी नगर पंचायत परिसरातील विविध सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या फुटेजच्या आधारे घटनेच्या वेळी एक संशयित व्यक्ती रेल्वे रुळांच्या दिशेने जाताना स्पष्टपणे दिसून आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दगडफेकीच्या घटनेनंतर आरोपी घाबरून नागपूर शहरात पळून आला होता. गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफ पथकाने नागपूरच्या ऑटोमोटिव्ह चौकातून आरोपी नरेंद्रकुमार सिरसा याला ताब्यात घेतले.
बायकोशी भांडण झाल्याने रागाच्या भरात कृत्य केल्याची कबुली
पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी त्याचे स्वतःच्या पत्नीसोबत जोरदार भांडण झाले होते. या भांडणामुळे तो प्रचंड मनस्तापात आणि संतापात होता. याच रागाच्या भरात तो रेल्वे रुळांच्या दिशेने गेला आणि समोरून जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसवर त्याने दगड भिरकावले. कौटुंबिक वादाचा राग थेट रेल्वे गाड्यांवर काढणाऱ्या या आरोपीवर रेल्वे कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.