छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. कन्नड येथील एस.एम. एजन्सीमध्ये तपासणीदरम्यान ‘लाल हिना’ ब्रँडची 2 लाख 96 हजार 380 रुपये किमतीची तब्बल 626 किलो मिरची पावडर आणि हळद पावडर जप्त करण्यात आली आहे. यामध्ये 418 किलो मिरची पावडर आणि 208 किलो हळद पावडरचा समावेश आहे.
तपासणीदरम्यान काय आढळले?
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा मानके आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. तसेच, स्वच्छतेसाठी अपुरी जागा, कामगारांची वार्षिक वैद्यकीय तपासणी न होणे आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणेचा अभाव यांसारख्या त्रुटीही निदर्शनास आल्या. FDA ने जप्त केलेला संपूर्ण साठा सीलबंद करून पुढील आदेश येईपर्यंत सुरक्षित ताब्यात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा FDA चे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.
यापूर्वीही FDA ची कारवाई
या मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरसह पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर यांसारख्या शहरांमध्येही FDA ने कारवाई केली होती. नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापुरात भेसळयुक्त मिठाई, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 4.25 कोटी रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. तुळजापूर येथे प्रसादासाठी वापरण्यात येणारा 510 किलो खवा, पेढे आणि कलाकंदही जप्त करण्यात आले होते.