कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट! बीडमध्ये मुलाने वडिलांवर झाडली गोळी; तिघे अटकेत

बीडच्या गेवराईतील संजय नगरमध्ये कौटुंबिक वादातून सावत्र वडिलांवर गोळीबार झाल्याची घटना घडली.

कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट! बीडमध्ये मुलाने वडिलांवर झाडली गोळी; तिघे अटकेत

बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात कौटुंबिक वादातून सावत्र वडिलांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराई शहरातील संजय नगर परिसरात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेत शेख मुसा हे जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगर परिसरात राहणारे शेख मुसा यांचे त्यांच्या पहिल्या पत्नी आणि तिच्या मुलासोबत कौटुंबिक वाद सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री काही जण शेख मुसा यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर शेख मुसा यांच्यावर त्यांच्या सावत्र मुलाने गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश धुराजी शिंदे याने गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा आरोप आहे. ही गोळी शेख मुसा यांच्या गुडघ्याला लागली. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी शेख मुसा यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. गोळीबारानंतर घटनास्थळ आणि परिसरातील परिस्थितीची पाहणी करून पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

दरम्यान, गोळीबार करणारा मंगेश शिंदे सध्या पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास केला जात आहे. तसेच गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, घटनेमागील नेमका वाद आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

या घटनेबाबत गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी माहिती दिली असून, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या गोळीबारामुळे गेवराई शहरातील संजय नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेमागील नेमके कारण आणि पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number