गोंदिया: मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरोली येथे स्वतःच्याच शेतात एका 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सायंकाळी उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव अनिल पवार असे असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, अनिल पवार हे आज सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता होते. त्यांचे मोठे भाऊ सुनील पवार हे त्यांचा शोध घेत असताना शेताकडे गेले असता शेताजवळ अनिल यांची गाडी आढळून आली. त्यानंतर शेतात शोध घेतला असता अनिल यांचा मृतदेह निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
हेही वाचा – भयंकर दुर्घटना! देवीच्या मंदिराबाहेर ट्रकने चिरडलं; 13 भाविकांचा मृत्यू, 40 जण जखमी
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव येथे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
राज्यभर शेतकऱ्यांच्या अशा घटनांमध्ये वाढ दिसून येत असून चिंतेचे वातावरण आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर आज गोंदियातूनही अशीच घटना समोर आली असून, पवार कुटुंबीयांसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –