पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून वाद विकोपाला; मालकाने इंडियन ऑइल अधिकाऱ्याला जागीच संपवलं, हिंगोली हादरलं

हिंगोलीतील चोंढी येथे पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून झालेल्या वादात इंडियन ऑइलचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला.

पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून वाद विकोपाला; मालकाने इंडियन ऑइल अधिकाऱ्याला जागीच संपवलं, हिंगोली हादरलं
Hingoli Crime

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून झालेल्या वादाला गंभीर वळण लागले आहे. चोंढी येथील पेट्रोल पंपावर कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चोंढी येथील पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी इंडियन ऑइल कंपनीचे व्यवस्थापक महेश शेळके हे आपल्या पथकासह गेले होते. पेट्रोल पंपाच्या ताब्याबाबत कंपनीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरून पंप मालक आणि कंपनीच्या पथकामध्ये वाद निर्माण झाला. सुरुवातीला झालेली बाचाबाची काही वेळातच अधिक तीव्र झाली.

हेही वाचा: अंगात भूत शिरल्याचा बनाव करून शाळकरी मुलीवर अत्याचार! बाहुली, लिंबू अन् चामडी गोफणीने…; सातारा हादरलं

या वादादरम्यान पंप मालक आणि त्याच्या मुलासह काही जणांनी महेश शेळके यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात शेळके गंभीर जखमी झाले. पेट्रोल पंपाच्या बाहेरील परिसरात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर दुखापत झाल्याने शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, वादाची सुरुवात कशी झाली आणि घटनेमध्ये कोणाची कोणती भूमिका होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील पेट्रोल पंप परिसरातील सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्याला ताबा घेण्याच्या कारवाईदरम्यान अशा प्रकारच्या हिंसक घटनेला सामोरे जावे लागल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या घटनेची केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनीही गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महेश शेळके यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून या घटनेचा निषेध केला. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून सुरू झालेला वाद थेट अधिकाऱ्याच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासातून या प्रकरणातील नेमकी पार्श्वभूमी आणि हल्ल्यामागील कारणे स्पष्ट होणार आहेत. सध्या पोलिसांकडून आरोपींची भूमिका, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर संबंधित बाबींची चौकशी सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number