जळगाव : मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्याच्या कारणातून एका तरुणाला वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याचा आरोप असून, या त्रासाला कंटाळून तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना जळगावात समोर आली आहे. आसोदा उड्डाणपुलाजवळ हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.
प्रशांत संजय सोनवणे (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत यांनी आपल्या मावस बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध केला होता. याच कारणातून काही जणांकडून त्यांना वारंवार धमक्या देण्यात येत होत्या आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा त्रास असह्य झाल्याने प्रशांत यांनी आसोदा उड्डाणपुलाजवळ गळफास घेऊन जीवन संपविले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
दरम्यान, प्रशांत यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींनी प्रशांत यांना धमकावून आणि त्रास देऊन टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्रशांत यांना नेमक्या कोणत्या प्रकारे धमक्या देण्यात आल्या, या प्रकारामागील कारण काय होते आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची भूमिका काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींविरोधातील आरोपांची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.