उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातून एका अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर निर्माण झालेला कायदेशीर ससेमिरा आणि गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी एका 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन केल्याची संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, पत्नीच्या निधनानंतर अवघ्या 10 दिवसांच्या आतच पतीनेही टोकाचे पाऊल उचलल्यामुळे 3 वर्षांची चिमुरडी पूर्णपणे अनाथ झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय? पत्नीच्या मृत्यूपासून सुरू झालेला तणाव
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जालौनमधील सिरसा कलार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेलखंड गावात राहणारा 30 वर्षीय भुरे कठेरिया हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. जानेवारी 2023 मध्ये त्याचे लग्न शिवानी (वय 27 वर्षे) हिच्याशी झाले होते. दरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी भुरेची पत्नी शिवानी हिने राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर मृत शिवानीची आई सीमा देवी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर आरोप केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत एफआयआर (FIR) नोंदवली गेली नव्हती.
तुरुंगात जाण्याच्या भीतीने मानसिक संतुलन सुटले
मृत भुरेचा मोठा भाऊ राजेश कठेरिया याने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांकडून सातत्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात होती. आपल्यावर गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला तुरुंगात जावे लागेल, या प्रचंड भीतीपोटी भुरे मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. सासरच्या लोकांचा वाढता दबाव सहन न झाल्याने त्याने अनेकदा सासूची भेट घेऊन कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याची विनंतीही केली होती. मात्र, वाढत्या तणावामुळे तो अत्यंत अस्वस्थ होता. बुधवारी दुपारी तो कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेला. काही वेळाने नरहन गावाजवळ यमुना नदीच्या काठावर असलेल्या एका वनक्षेत्रात बाभळीच्या झाडाला त्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.
हेही वाचा – संतापजनक घटना! दांडिया खेळताना झालेल्या वादातून मित्राचा जीव घेतला; 8 वर्षांच्या मैत्रीचा थरकाप उडवणारा अंत
स्थानिकांची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई; तपास सुरू
स्थानिक नागरिकांना जंगलात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलीस आणि मृत भुरेच्या कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच काल्पी कोतवालीचे स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) अजय ब्रह्म तिवारी आणि सिरसा कलारचे एसएचओ वरुण प्रताप सिंग हे आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जालौनचे सर्कल ऑफिसर अजय कुमार सिंग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात पत्नीच्या निधनानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर भीतीपोटीच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी पोलीस सर्व बाजूने सखोल तपास करत असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.