Menstrual Cup Drug Smuggling : समाजात मासिक धर्म (Periods) या विषयाभोवती असलेल्या संकोच आणि संवादाचा अभाव यांचा गैरफायदा घेत एका महिला तस्कराने ड्रग्ज तस्करीचा अत्यंत धक्कादायक मार्ग शोधून काढला होता. पोलिसांच्या कडक तपासणीतून सुटण्यासाठी तिने मेंस्ट्रुअल कपचा (Menstrual Cup) वापर करत त्यात एमडीएमए (MDMA) हा महागडा अमली पदार्थ भरून तो कप स्वतःच्या शरीरात लपवला होता. बस प्रवासादरम्यान झालेल्या पोलीस तपासणीतही ती सहजपणे वाचल्याने तिचा आत्मविश्वास वाढला होता.
लॉजमधून विक्री
या कारवाईत आबकारी विभागाने 30 वर्षीय सरिता आणि तिचा 29 वर्षीय साथीदार मोहम्मद शफी या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही बंगळुरूहून मोठ्या प्रमाणावर एमडीएमए ड्रग्ज खरेदी करायचे आणि केरळमधील एर्नाकुलम तसेच अलाप्पुझा येथील वेगवेगळ्या लॉजमध्ये राहून त्याची विक्री करायचे. गोपनीय माहितीच्या आधारे आबकारी पथकाने गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. धाडीदरम्यान साऊथ एर्नाकुलमच्या एका लॉजमधून पोलिसांनी शफीला ताब्यात घेतले, जिथे त्याच्याकडून 65.27 ग्राम एमडीएमए हस्तगत करण्यात आले. केरळ आबकारी विभागाच्या विशेष पथकाने 'ऑपरेशन थंडर' (Operation Thunder) राबवून या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला.
पोलीस चेकिंगला चकवा अन् रात्री 10:30 वाजता थरारक अटक
चौकशीदरम्यान समोर आले की, बंगळुरूहून बसने प्रवास करताना कन्नूर जिल्ह्यातील इरिट्टी येथे तपासणी झाली असता शफीने त्याच्या जवळील ड्रग्ज फेकून दिले होते. मात्र, सरिताने मेंस्ट्रुअल कपमध्ये एमडीएमए भरून ते गमच्या साहाय्याने सील करून शरीरात लपवले असल्याने ती चेकिंगमधून सुटली. जेव्हा आबकारी पथकाने लॉजवर छापा टाकला, तेव्हा सरिता अलाप्पुझा येथे ड्रग्ज पुरवण्यासाठी गेली होती. अधिकाऱ्यांनी लॉजमध्येच सापळा रचून रात्री 10:30 च्या सुमारास ती परतताच तिला अटक केली. तिच्या कबुलीनंतर अलाप्पुझा येथील एका घरातून आणखी 28.76 ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले.
4,000 रुपये प्रतिग्राम दर; एका होम नर्सचा तस्कर बनण्याचा प्रवास
आबकारी विभागाने या पूर्ण कारवाईत एकूण 94.032 ग्राम एमडीएमए, एक मोबाईल फोन आणि विक्रीतून मिळालेले 17,770 रुपये जप्त केले आहेत. जप्त केलेल्या या सिंथेटिक ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी किंमत आहे. आरोपी हे एमडीएमए ग्राहकांना 4,000 रुपये प्रतिग्रॅम या दराने विकत असत. विशेष म्हणजे, आरोपी महिला सरिता ही पूर्वी होम नर्स म्हणून काम करत होती, तर मोहम्मद शफी हा इंटीरियर डिझायनर म्हणून कार्यरत होता. या दोघांकडून ड्रग्ज खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची ओळख पटली असून ते सध्या प्रशासनाच्या रडारवर आहेत.
'ऑपरेशन थंडर'ची यशस्वी कामगिरी आणि तपास
एर्नाकुलम आबकारी निरीक्षक आर. अभिराज आणि त्यांच्या पथकाने 'ऑपरेशन थंडर'अंतर्गत ही अत्यंत धाडसी आणि यशस्वी कारवाई पार पाडली. अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अशा प्रकारे मेंस्ट्रुअल कपचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ समोर आल्याने सुरक्षा यंत्रणा अवाक झाल्या आहेत. या रॅकेटमध्ये बंगळुरूमधील आणखी कोणते मोठे ड्रग्ज पुरवठादार सामील आहेत का, याचा सखोल तपास आता आबकारी विभागाकडून केला जात आहे.