रायफल साफ करताना गोळी सुटली अन् माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू! पण सत्य समोर येताच खळबळ; आजोबांनीच नातवाला संपवलं, कारण काय?

लोणावळ्यात प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांनी नातवाची रायफलमधून गोळी झाडून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर अपघाताचा बनाव करण्यात आला, मात्र पोलिस तपासात सत्य उघड झाले.

रायफल साफ करताना गोळी सुटली अन् माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू! पण सत्य समोर येताच खळबळ; आजोबांनीच नातवाला संपवलं, कारण काय?
Lonavala Crime

लोणावळा : लोणावळ्यातील भुशी परिसरात मालमत्तेच्या वादातून एका आजोबांनी आपल्या 33 वर्षीय नातवाची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर ही घटना अपघात असल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी आजोबांसह कुटुंबातील आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 5 ऑक्टोबर रोजी भुशी येथील प्रसिद्ध हॉटेल मोतीरामच्या आवारात घडली. अभय माणिक मराठे असे मृत तरुणाचे नाव आहे. अभय हे माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे पुत्र होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभय आणि त्यांचे 83 वर्षीय आजोबा मोतीराम मराठे यांच्यात गेल्या काही काळापासून मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांवरून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी हा वाद अधिकच विकोपाला गेला. याच रागातून मोतीराम मराठे यांनी त्यांच्याकडे असलेल्या परवानाधारक रायफलमधून अभय यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे.

गोळी लागल्यानंतर अभय यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार लोणावळा शहर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

मात्र, रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असताना अभय यांच्या पोटावर गोळी लागल्याची जखम आढळून आली. त्यामुळे पोलिसांना घटनेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत हॉटेलमधील वेटर आणि कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली.

चौकशी आणि तपासादरम्यान ही घटना अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांच्या वादातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोतीराम मराठे यांना शिकारीची आवड असल्याने त्यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात दोन रायफल खरेदी केल्या होत्या. त्यापैकी एका परवानाधारक रायफलचा वापर अभय यांच्या हत्येसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी मोतीराम मराठे यांच्यासह हत्या लपवण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून कुटुंबातील आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे लोणावळ्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number