Brother Kills Younger Brother : केवळ एका जोडी शूजवरून झालेल्या वादात एका भावाने दुसऱ्याचा जीव घेतला. 16 वर्षांच्या सूरजने ऑनलाइन नवीन शूज मागवले होते; परंतु, ते शूज आधी आपणच घालणार असा हट्ट त्याचा 15 वर्षांचा धाकटा भाऊ लक्ष्मणने धरला. या साध्या कारणावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात सूरजने जवळच पडलेली कात्री उचलली आणि लक्ष्मणवर सपासप वार केले. उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. महाराजगंजच्या चौमुखा गावात सोमवारी ही धक्कादायक घटना घडली.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू
सूरजने केलेल्या या अनपेक्षित हल्ल्यात लक्ष्मणच्या डोक्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य धावत आले आणि त्यांनी जखमी लक्ष्मणला तात्काळ घुगली सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला महाराजगंज जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, जिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच लक्ष्मणची प्राणज्योत मालवली होती. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एका क्षणाच्या रागामुळे हसत्या-खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा - Paratwada Case: मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या अयानचं आणखी एक काळं कृत्य उघड; आईचे दागिने चोरले अन्...
आरोपी भाऊ फरार, पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर आरोपी सूरज घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. घुगली पोलीस स्टेशनचे अधिकारी कुंवर गौरव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून अद्याप कुटुंबीयांकडून लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार दाखल होताच रीतसर कायदेशीर कारवाई केली जाईल. पोलिसांनी लक्ष्मणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी शेजाऱ्यांची आणि कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. केवळ एका वस्तूवरून सख्खा भाऊ दुसऱ्याचा शत्रू कसा बनू शकतो, यावर गावकरी अविश्वास व्यक्त करत आहेत.
परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेमुळे चौमुखा गावात शोककळा पसरली असून मुलांच्या अशा हिंसक वागण्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऑनलाईन खरेदी केलेल्या एका वस्तूमुळे 15 आणि 16 वर्षांच्या मुलांमध्ये झालेली ही हिंसक चकमक समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे दर्शन घडवते. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके तैनात केली आहेत. घरातील किरकोळ कुरबुरी इतक्या थराला जाऊ शकतात, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. लक्ष्मणच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण गावात सध्या या खळबळजनक प्रकरणाचीच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा - Ashok Kharat case : 'महिलेला खरातकडे नेऊन इच्छे विरुद्ध लिंबू फिरवला, गुंगीचे औषध देऊन...' ठाण्यातील माजी उच्चअधिकारी निघाला खरातचा भक्त