Samruddhi Mahamarg Robbery: समृद्धी महामार्गावर राहुरी येथील एका तरुण उद्योजकाला भरदिवसा लुटून संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत या दरोड्याचा मास्टरमाइंड परशुराम गायकवाड आणि त्याच्या एका साथीदाराला तब्बल 1171 किमी अंतरावर असलेल्या दिल्लीतून ताब्यात घेतले. दरोडा टाकल्यानंतर टोळीतील इतर सदस्य विविध ठिकाणी लपले होते, तर मुख्य आरोपी दिल्लीत पोहोचला होता.
पबमध्ये उधळले लाखो रुपये आणि छोले-भटुरेवर मारला ताव
लूट मारल्यानंतर दिल्लीत पळून गेलेल्या परशुराम गायकवाडबाबत अत्यंत धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. दरोड्यात मिळालेल्या पैशांमधून त्याने दिल्लीतील एका पबमध्ये एकाच रात्रीत तब्बल 1.5 लाख रुपये उधळल्याचे निष्पन्न झाले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विशेष पथकाने शोध घेत त्याला दिल्लीतील एका हॉटेलात छोले-भटुरेवर ताव मारत असतानाच थेट उचलले.
पोलिसांची देहबोली आणि घामावरून भामट्याने त्यांना ओळखले, पण…
साध्या वेशात मागावर असलेल्या पोलिसांना ओळखण्याची चाणाक्ष बुद्धी भामट्याकडे होती. दिल्लीत पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला तिथल्या वातावरणात येत असलेला घाम आणि त्यांची देहबोली पाहून ते महाराष्ट्रातील पोलीस असल्याचे परशुरामने ताडले होते. तो सावध होऊन तिथून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच, क्षणाचाही विलंब न लावता साध्या वेशातील पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून मुसक्या आवळल्या.
सीसीटीव्ही नेटवर्क आणि पोलिसांवर हल्ल्याचा कट
आरोपीच्या गुन्हेगारी पद्धतीचा तपासात उघड झालेला भाग असा आहे –
– परशुराम गायकवाडने गावाकडील घराभोवती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठे जाळे उभारले होते.
– या सर्व कॅमेऱ्यांचे थेट ॲक्सेस त्याच्या मोबाईलवर होते, ज्यामुळे गावात कोणताही अनोळखी व्यक्ती किंवा पोलीस आल्यास त्याला लगेच सुगावा लागायचा.
– बीडमधील एका ठराविक कॉलनीत या टोळीचा मुख्य वावर असायचा.
– या भागात पोलीस तपासासाठी आल्यास स्थानिक महिला आणि नागरिकांना पुढे करून पोलिसांवर दगडफेक घडवून आणली जायची.
अन् दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
समृद्धी महामार्गासारख्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यावर दोन ठिकाणी झालेल्या या दरोड्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये पुन्हा विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.