नागपूर प्रतिनिधी – तेजस मोहतुरे
उत्तर नागपूरमधून एक मन हेलावून सोडणारी आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका 18 वर्षीय आरोपीने धक्कादायक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर नागपूर परिसरातील आहे. येथील एकाच शाळेत 18 वर्षीय आरोपी तरुण आणि 16 वर्षीय पीडित मुलगी शिकत होते. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने हे प्रकरण लपवण्यासाठी धोकादायक मार्ग अवलंबला.
त्याने युट्यूबवर गर्भपातासंबंधीचे व्हिडिओ पाहून एका औषधी वनस्पतींचे मिश्रण तयार केले आणि पीडितेला देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून त्यामुळे पीडितेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
मात्र, गर्भपाताचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर पीडित मुलीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिने घरीच एका बाळाला जन्म दिला. हा प्रकार कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 18 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.