भारतीय संविधान, लोकशाही आणि संसदीय व्यवस्थेवर भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ‘जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आहे, तोपर्यंत निर्णय संसदेतच होणार,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी संविधानाची ताकद, निवडणुकांद्वारे सत्ताबदल आणि नागरिकांच्या न्यायाच्या अधिकारावरही भाष्य केलं.
‘हा भारत आहे, पाकिस्तान नाही’
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘हा भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ नाही. त्यांच्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान नाही. जोपर्यंत संविधान आपल्याकडे आहे, तोपर्यंत निर्णय संसद घेईल, इतकी ताकद आपल्या संविधानात आहे.’