प्रवीण खंदारे, प्रतिनिधी
नांदेड : प्रेमसंबंधाला विरोध असल्यामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. आरोपी मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून तरुणाला गोळ्या झाडून तसेच दगडाने ठेचून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. या अमानुष हत्येनंतर प्रेयसी मुलीने आपल्या प्रियकराच्या मृतदेहासमोर शोकाकुल अवस्थेत विवाह केल्याची घटना संपूर्ण शहराला हादरवणारी ठरली आहे. इटवारा भागातील सक्षम ताटे या तरुणाची गुरूवारी सायंकाळी हत्या करण्यात आली.
सक्षम आणि आंचल मामिडवार हे दोघेही परस्परांच्या प्रेमात असून काही दिवसांत विवाह करणार असल्याची माहिती आरोपी गजानन मामिडवार (मुलीचे वडील) याला मिळाली होती. आंतरजातीय विवाहास विरोध असल्याने त्यांनी मुलगा आणि दोन भावांसह मिळून सक्षमचा खून केला. पोलिसांच्या माहितीनुसार सक्षमवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली.
या घटनेनंतर शुक्रवारी सक्षम ताटे याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्याआधी प्रेयसी आंचल मामिडवार हिने समाजाच्या बंधनांना छेद देत मृत प्रियकराशी ‘लग्न’ करण्याचा भावनिक आणि धाडसी निर्णय घेतला. सक्षमच्या पार्थिवावर तिने हळद-कुंकू लावून विवाहाची प्रतीकात्मक विधी केला. “माझ्या वडिलांनी आणि भावाने माझ्या प्रियकराला मारले, पण ते हरले… माझा प्रियकर मरूनही जिंकला,” अशा आक्रोशात आंचलने टाहो फोडला. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तिने केली आहे.
या प्रकरणात आरोपी वडील गजानन मामिडवार, दोन भाऊ आणि अन्य तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. इतवारा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने नांदेडसह राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून विजातीय प्रेमसंबंध आणि मानहानीच्या नावाने होणाऱ्या हत्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
हेही वाचा: Nashik Tapovan Controversy: तपोवन प्रकरणावरून राज ठाकरे मैदानात; सरकारला दिला थेट इशारा