Nashik Corporate Jihad Case : नाशिकमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील आरोपी निदा खान हिला मोठा दणका बसला आहे. तिच्या वतीने दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या प्रकरणात हिंदू तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि त्यांना विशिष्ट पद्धतीने फसवणूक करून जाळ्यात ओढल्याचा गंभीर आरोप निदा खानवर ठेवण्यात आला आहे. सध्या ती फरार असून, तपासाची व्याप्ती पाहता तिला जामीन नाकारण्यात आला आहे.
अटकपूर्व जामीन फेटाळला
तपासादरम्यान समोर आलेल्या पुराव्यांनुसार, एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना हेरून त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न केला जात होता. या प्रकरणाचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीआहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेऊन तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
पोलिस तपास योग्य दिशेने?
सरकार पक्षातर्फे या जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शवण्यात आला होता, कारण आरोपी बाहेर आल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची भीती व्यक्त केली गेली होती. नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ज्या आरोपींना अटक केली आहे, त्यांना मदत करण्यात निदा खानचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. तिच्या अटकेनंतर आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप निदा खान पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दरम्यान, या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा सहभाग आहे याचाही शोध घेतला जात आहे. निदा खानचा जामीन अर्ज फेटाळला गेल्यामुळे पीडित तरुणींना न्याय मिळण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.