प्रेयसीसाठी धर्मांतर केलं, पण भररस्त्यात तिचाच जीव घेतला! नवी मुंबईत नेमकं काय घडलं?

नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ सादिया शेख या तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला.
Navi Mumbai Crime
Navi Mumbai Crime

नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सादिया शेख असे मृत तरुणीचे नाव असून, दानिश अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला घणसोली येथून अटक केली आहे.

चार वर्षांची मैत्री, पण नात्यात दुरावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिया शेख आणि दानिश अन्सारी यांची गेल्या चार वर्षांपासून ओळख होती. सादियासाठी दानिशने धर्मांतर करून आपले नाव अनिलवरून दानिश ठेवल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सादिया त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने दानिश नाराज होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेरुळमध्ये वाद, चाकूने केला हल्ला

20 ऑक्टोबर रोजी नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ दोघांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. या वादादरम्यान दानिशने सादियावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादियाला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सादियाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक

घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर आरोपी दानिश अन्सारी याला घणसोली येथील त्याच्या नातेवाइकाच्या घरातून अटक करण्यात आली. तसेच, हल्ल्यासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, घटनेमागील नेमकी कारणे आणि इतर बाबींचा तपासातून उलगडा होणार आहे. प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version