Ketan Agarwal Case: लोहगड येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी मानल्या जाणाऱ्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयाने पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तांत्रिक अडचणींमुळे या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष न्यायालयात न होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचा निर्णय दिला.
आरोपपत्र दाखल होईपर्यंत कोठडी वाढण्याची शक्यता
आरोपींचे वकील ॲड. राधिकेश उत्तरवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तपास यंत्रणेकडून न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल होईपर्यंत कायद्यानुसार आरोपींच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी नियमितपणे वाढवला जातो. तपास पूर्ण होऊन आरोपपत्र सादर होईपर्यंत साधारणपणे प्रत्येक 14 दिवसांनी कोठडीवाढीची प्रक्रिया सुरू राहू शकते. ही प्रक्रिया कायदेशीर तरतुदीनुसार सुमारे 90 दिवसांपर्यंत चालू राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसपी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे न्यायालयाचे निर्देश
दरम्यान, बचाव पक्षाने केलेल्या एका महत्त्वाच्या अर्जावर न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वार, लॉबी आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित फुटेज हटवू किंवा नष्ट करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
तपासातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष
केतन अग्रवाल प्रकरणाने मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठी चर्चा निर्माण केली आहे. सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याच्या आदेशामुळे पुढील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाकडून तपास प्रक्रियेवर विविध मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.