नोएडामधील कामगार आंदोलनामागे पाकिस्तानमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकावण्याचा प्रयत्न झाल्याचा मोठा दावा पोलिसांनी केला आहे. गौतमबुद्ध नगरच्या पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. त्यांच्या मते, वेतनवाढीच्या मागणीवरून सुरू झालेले आंदोलन नंतर नियोजनबद्ध हिंसाचारात बदलले गेले.
पोलिसांच्या तपासात ‘मीर इलायसी’ आणि ‘आयुषी तिवारी’ या नावाने चालणारी दोन एक्स हँडल्स पाकिस्तानमधून ऑपरेट होत असल्याचे समोर आले आहे. या खात्यांवरून पोलिस गोळीबारात काही कामगारांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवण्यात आली. यामुळे आंदोलक अधिक भडकले आणि परिस्थिती आणखी बिघडली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात ‘राष्ट्रवादी वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया’शी संबंधित रुपेश राय, मनीषा चौहान आणि आदित्य आनंद या तिघांची नावे समोर आली आहेत. यापैकी रुपेश राय आणि मनीषा चौहान यांना अटक करण्यात आली असून आदित्य आनंद फरार आहे. पोलिसांच्या मते, हे तिघे आंदोलनाच्या वेळी नोएडामध्ये उपस्थित होते आणि भडकाऊ भाषणांद्वारे जमावाला चिथावणी देत होते.
तपासात असेही समोर आले आहे की, आंदोलनासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात आला होता. पकड टाळण्यासाठी व्हीपीएनचाही गैरवापर करण्यात आल्याचा संशय आहे. या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 62 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. बहुतेक अटक केलेले लोक हे प्रत्यक्ष कामगार नसून बाहेरील असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
सध्या नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील परिस्थिती नियंत्रणात असून बहुतांश कारखाने पुन्हा सुरू झाले आहेत. पोलिसांकडून सातत्याने फ्लॅग मार्च करण्यात येत असून संवेदनशील भागांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.