बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या दांडी पाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात 25 वर्षीय प्रतीक भगवान डुकले याचा मृतदेह आढळून आला. मध्यरात्री एका तरुणीने तक्रार दिल्यानंतर प्रतीकविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना घातपाताची असू शकते, असा आरोप प्रतीकच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घातपाताचा आरोप का?
फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांनी प्रतीकला पकडून ठेवल्याची माहिती त्याच्या वडिलांना देण्यात आली होती, असा कुटुंबीयांचा दावा आहे. प्रतीकला कुटुंबीयांशी बोलू दिले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असे म्हणत त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रतीकचे वडील त्याला घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना काही वेळातच त्याचा मृतदेह आढळल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. प्रतीकला मारहाण झाल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. पुढील तपासातूनच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर-