Saturday, June 06, 2026 09:58:40 AM

Crime News: प्लंबरने किरकोळ वादातून महिलेला संपवलं; 5 महिन्यांनंतर स्वयंपाकघराच्या जमिनीखाली सागाडा सापडल्याने झाला गुन्ह्याचा उलगडा

एका 47 वर्षीय प्लंबरने आपल्या ओळखीच्या महिलेला संपवून तिचा मृतदेह चक्क स्वयंपाकघराच्या जमिनीखाली पुरला. पाच महिने हे गुपित जगापासून दडलेले होते, मात्र...

crime news प्लंबरने किरकोळ वादातून महिलेला संपवलं 5 महिन्यांनंतर स्वयंपाकघराच्या जमिनीखाली सागाडा सापडल्याने झाला गुन्ह्याचा उलगडा

Crime News: तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबादमधील मलकजगिरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका 47 वर्षीय प्लंबरने आपल्या ओळखीच्या महिलेला संपवून तिचा मृतदेह चक्क स्वयंपाकघराच्या जमिनीखाली पुरला. पाच महिने हे गुपित जगापासून दडलेले होते, मात्र घराला लागलेल्या टाळ्यामुळे आणि घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे अखेर या भीषण कृत्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

मैत्रीचा असा झाला करुण अंत
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्लंबर आपल्या कुटुंबापासून विभक्त होऊन मलकजगिरी येथे भाड्याने राहत होता. त्याची ओळख पीडित महिलेशी एका 'लेबर हब'मध्ये झाली होती. दोघेही एकाच वयाचे असल्याने त्यांची मैत्री झाली आणि ते अनेकदा एकत्र मद्यपान करत असत. 15 डिसेंबर 2025 रोजी, काम न मिळाल्याने या दोघांनी मद्यपान करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला एका दुकानाबाहेर आणि नंतर आरोपीच्या घरी त्यांची मद्यपानाची मैफल जमली. मात्र, याच वेळी झालेल्या वादाचे रूपांतर गुन्ह्यात झाले.

अपमानकारक शेरे अन् काठीने प्रहार
मद्यधुंद अवस्थेत असताना पीडित महिलेने आरोपीच्या खासगी आयुष्याबद्दल काही अपमानकारक भाष्य केले. या किरकोळ वादातून आरोपीचा राग अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने जवळच असलेल्या एका लाकडी काठीने महिलेच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हा घाव इतका वर्मी होता की, त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोर मृतदेह पाहून घाबरलेल्या आरोपीने पोलिसांच्या भीतीने तो लपवण्याचा कट रचला.

पुरावा नष्ट करण्यासाठी निर्दयी पाऊल
हत्येनंतर आरोपीने अत्यंत क्रूरपणे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेचे हात-पाय आणि गळा दोरीने बांधला. त्यानंतर घराच्या स्वयंपाकघरातील जमिनीचा काही भाग खणून तिथे मृतदेह टाकला आणि वरून विटांची रचना करून तो भाग पुन्हा सपाट केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने घराला कुलूप लावले आणि तिथून पळ काढला. पीडित महिलेचा तिच्या कुटुंबाशी संपर्क नसल्यामुळे ती बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार पोलिसांत दाखल झाली नव्हती, ज्यामुळे आरोपी पाच महिने मोकळा फिरत होता.

घरमालकामुळे लागला गुन्ह्याचा छडा
गेल्या अनेक महिन्यांपासून भाडे थकीत असल्याने आणि भाडेकरूचा पत्ता नसल्याने अखेर 17 एप्रिल रोजी घरमालकाने घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करताच त्यांना असह्य दुर्गंधी आली. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. जेव्हा स्वयंपाकघरातील ओटा आणि जमिनीचा भाग उकरण्यात आला, तेव्हा तिथे महिलेचा कुजलेला सांगाडा आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा - Pune Bhor Nasrapur Case Update:'ही मारामारीची किरकोळ केस, त्यात मला गोवण्यात आलंय...', नसरापूर प्रकरणातील नराधमाचं धक्कादायक उत्तर, काय घडलं न्यायालयात?

आरोपीला बेड्या
मलकाजगिरीचे पोलीस उपायुक्त (DCP) सी. श्रीधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्रावून आरोपीचा शोध सुरू केला. अखेर 1 मे रोजी ज्युबिली बस स्थानक परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने मानवी नात्यातील क्रूरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.


सम्बन्धित सामग्री