पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी जीवन संपवल्याची घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय 46) हे पुणे पोलीस दलात कार्यरत होते. ते खडक पोलीस ठाण्यात सेवा बजावत होते. पत्नी आणि मुलीसोबत ते शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेल्याने सुर्वे हे घरी एकटेच होते.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात जीवन संपवल्याची घटना समोर आली. बराच वेळ काही हालचाल न झाल्याने घटनेची माहिती समोर आली. यानंतर संबंधित पोलिसांना माहिती देण्यात आली आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन सुर्वे यांनी नेमकं कोणत्या कारणामुळे हे पाऊल उचललं, याचा तपास सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून केला जात आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील परिस्थिती, कामाशी संबंधित बाबी किंवा अन्य कोणत्या कारणाचा यामागे संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.
या घटनेची नोंद पोलिसांकडून अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून तपासातून पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.