दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी! सुपारी विलासाची, पण गुंडांनी गोळ्या झाडल्या उस्मान शेखवर; नेमकं काय घडलं?

पुण्यात जागेच्या वादातून विकास नवले यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती.
Pune Crime
Pune Crime

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कारेगाव येथे पाण्याच्या प्लांटमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणाचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र, तपासातून या घटनेमागील कारण समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जागेच्या वादातून विकास नवले यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. नवले यांना ठार करण्यासाठी मारेकऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, मारेकरी कारेगाव येथील नवले यांच्या पाण्याच्या प्लांटवर पोहोचले असता त्यांच्याकडून मोठी चूक झाली.

मारेकऱ्यांनी प्लांटमध्ये काम करणारे हमजा उस्मान शेख यांनाच विकास नवले समजले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारात हमजा उस्मान शेख यांचा मृत्यू झाला. कोणताही संबंध नसलेल्या निष्पाप कामगाराचा या प्रकरणात बळी गेल्याचे तपासातून समोर आले आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी विविध दिशांनी तपास करत या प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान पाच जणांचा सहभाग समोर आल्यानंतर पोलिसांनी सार्थक कोहकडे, तुषार तोडकर, संतोष मांजरे, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांना अटक केली आहे.

दरम्यान, या हत्येसाठी प्रत्यक्ष गोळीबार करणारे पवन हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या जाधव हे दोघे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

जागेच्या वादातून एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी देण्यात आली; मात्र चुकीच्या व्यक्तीला लक्ष्य केल्याने निष्पाप कामगाराचा जीव गेल्याने या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version