Pune: विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरीचा धुमाकूळ; शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

पुण्यात गणेश विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली.
विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ; 11 जण अटकेत
विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरांचा धुमाकूळ; 11 जण अटकेत

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीतील प्रचंड गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीवर शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 63 मोबाईल फोन, एक शेवरलेट क्रूझ कार आणि अन्य शस्त्रांसह एकूण 30 लाख 57 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, झाशीची राणी चौक, महापालिका परिसर आणि लक्ष्मी रस्ता या भागांत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी खुडे ब्रिजच्या नदीपात्रालगत काही जण शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहितीही पोलिसांकडे आली.

हेही वाचा: Divya Shinde: निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून 5 लाखांची मागणी अन् मारहाण! दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; पुण्यात खळबळ

या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने सापळा रचला. कारवाईदरम्यान 11 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झडतीमध्ये त्यांच्या ताब्यातून ६३ मोबाईल फोन, शेवरलेट क्रूझ कार, सुरी, कटर आणि लाल मिरची पावडर जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात या टोळीचा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरीशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या काही आरोपींविरुद्ध नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण परिसरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीचा इतर गुन्ह्यांशीही संबंध आहे का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचा: Ahilyanagar Crime: वृद्धाश्रमात पहाटेचा थरार! सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींकडून आणखी चोरीचे मोबाईल किंवा इतर गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गणेश विसर्जनासारख्या मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version