Cremated Man Found Alive: रवी कुमार नावाचा तरुण 5 ऑगस्ट रोजी घरातून अचानक निघून गेला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडला नाही. अखेर त्यांनी 11 ऑगस्ट रोजी कपुरथला पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या दरम्यान पोलिसांना एक अर्धवट जळालेला आणि छिन्नविछिन्न झालेला अनोळखी मृतदेह आढळून आला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी रवीच्या कुटुंबीयांना पाचारण केले. चेहऱ्याची विद्रुपता आणि अंगावरील कपड्यांच्या आधारे तो मृतदेह रवीचाच असावा असा गैरसमज झाल्याने दुःखद अंतःकरणाने कुटुंबीयांनी 13 ऑगस्ट रोजी त्यावर अंत्यसंस्कार पार पाडले. ही पंजाबमधील कपुरथला भागातील घटना आहे.
15 दिवसांनंतर तुरुंगातून आलेल्या फोनने उडाली भंबेरी
आपल्या तरुण मुलाचे निधन झाल्याच्या दुःखात संपूर्ण कुटुंब बुडालेले असतानाच 2 सप्टेंबर रोजी कपुरथला मध्यवर्ती कारागृहातून एक अनपेक्षित फोन आला. फोनवरील कर्मचाऱ्याने रवी कुमार जिवंत असून तो तुरुंगात बंदिस्त असल्याचे सांगताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. सुरुवातीला या बातमीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता, मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी संपूर्ण कुटुंबीयांनी तुरुंगात धाव घेतली. तेथे रवी प्रत्यक्ष समोर जिवंत उभा असलेला पाहून कुटुंबीयांना धक्का बसला, पण त्याच वेळी त्यांच्या आनंदाला उधाण आले.
हेही वाचा – Spurious Liquor: धक्कादायक बातमी! नशा बेतली जीवावर; बनावट दारुने घेतले 9 बळी, परिसरात खळबळ
बेघर भटकंतीमुळे पोलिसांची कारवाई आणि तुरुंगवास
घरातून निघून गेल्यानंतर रवी रस्त्यावर भटकत असताना जलंधर पोलिसांनी त्याला संशयास्पदरित्या फिरताना (Vagrancy) ताब्यात घेतले होते. आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला कपुरथला येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. एका बाजूला पोलिस आणि कुटुंबीय त्याचा बाहेर शोध घेत होते, तर दुसरीकडे तो तुरुंगातच हजर होता. तुरुंग प्रशासनाला ओळख पटल्यानंतर त्यांनी थेट त्याच्या घरी संपर्क साधल्यामुळे ही धक्कादायक पण दिलासादायक बाब समोर आली.
पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह अन् त्या अनोळखी मृतदेहाचं कोडं
या अजब घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि मृतदेहाची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रवी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, कुटुंबीयांनी ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले तो व्यक्ती नेमका कोण होता, असा नवा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपासाचे आदेश दिले असून, त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा – Bengaluru Crime: कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे महिलेला मिळाली जीवघेणी शिक्षा, धक्कादायक घटना समोर