पुणे : बारामतीत दोन दिवसांपूर्वी एका १४ वर्षीय मुलीच्या मृत्यूने शहर पुन्हा एकदा हादरलं. विशेष म्हणजे ही मुलगी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतारे यांनी कन्या होती. या अल्पवयीन मुलीने पाच मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने बारामती सून्न झाली होती. आई रागावल्याच्या शुल्लक कारणावरून रागातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
या घटनेबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत माहिती दिली. बारामती शहरातील रुई परिसरातील 'साई गणेश नगर' येथे राहणारी ही 14 वर्षीय मुलगी 22 ऑगस्ट रोजी आई रागावल्यामुळे घरातून निघून गेली होती. मुलगी रात्रभर घरी न परतल्याने आणि तिचा शोध न लागल्यामुळे 25 ऑगस्ट रोजी पालकांनी पोलिसांत धाव घेत अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. शोध घेताना शहरातील एका पाच मजली इमारतीमध्ये या मुलीचा मृतदेह आढळून आला.
घटनास्थळाची पाहणी केली असता, संबंधित इमारतीचा गच्चीचा दरवाजा मुलीने बाहेरून बंद केला होता. तसेच तिची चप्पलही घटनास्थळी आढळून आली. सर्व तांत्रिक व प्रत्यक्ष पुराव्यांवरून तिने पाचव्या मजल्यावरून उडी मारूनच आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.