मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात उघड्या मॅनहोलचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. शहरातील रस्त्यांवर असलेल्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, या धोक्यामुळे आणखी एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. सांताक्रुज पूर्वेला व्हि. एन देसाई रुग्णालया शेजारील रस्ता क्रमांक आठवर असलेल्या मॅन हॉलमध्ये काम करताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
संतोष काष्टे असं मृत व्यक्तीचं नाव असून याच परिसरात असलेल्या नवजीवन चाळीत संतोष काष्टे राहत होते. यावेळी अजय नावाची आणखीन एक व्यक्ती मॅनहोलमध्ये उतरली होती तिची प्रकृती गंभीर असून व्हि. एन देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विलास जाधव या कॉन्ट्रॅक्टरने पालिकेचाच निवृत्त कर्मचारी असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मानहोल शेजारी असलेल्या भव्य निकेतन इमारतीतील व्यक्तींनी विलास जाधव याला मॅनहोल स्वच्छ करण्यास सांगितलं होतं असा स्थानिकांचा दावा आहे.
हेही वाचा- कुपवाडामध्ये भीषण रस्ते अपघात; वाहन दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी
मात्र मुंबई मनपा अधिकाऱ्यांना न कळवता प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला मॅनहोल साफ करण्याचे कॉन्ट्रॅक्ट का दिले असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. तसेच पालिकेचा निवृत्त कर्मचारी असे कॉन्ट्रॅक्ट कसे घेतो असाही प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टर विलास जाधव याला वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जोवर न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा स्थानिकांचा पवित्रा घेतला आहे.
पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे अनेकदा मॅनहोल दिसून येत नाहीत, त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण होतो. संबंधित ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था, मजबूत झाकणं आणि वेळेवर देखभाल न झाल्यास अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कायम राहते.
या घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर आणि शहरातील मॅनहोल व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांच्या जीविताची जबाबदारी लक्षात घेता धोकादायक मॅनहोलची तातडीने पाहणी करून त्यांची दुरुस्ती करणे, योग्य बॅरिकेडिंग करणे आणि नियमित देखभाल व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.