अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील खल्लार या गावात आज दुपारी एक थरारक घटना घडली आहे. गावच्या मध्यवर्ती असलेल्या भर बाजार चौकातच दिवसाढवळ्या एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करत त्याची हत्या करण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेने संपूर्ण दर्यापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पाहुणे म्हणून घरी आले अन् अनर्थ घडला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव नईम शहा तुराब शहा,वय 42 वर्षे असून ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील गिट्टी खदान परिसराचे रहिवासी होते. काही कामानिमित्ताने ते खल्लार येथील एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी पाहुणे म्हणून आले होते.
हेही वाचा-15 वर्षे भावाला राखी, आता त्याचीच झाली बायको; वडिलांबाबत धक्कादायक माहिती समोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहुणे म्हणून आलेल्या नईम शहा यांचा घरातील लोकांशी काही कारणावरुन वाद झाला. सुरुवातील किरकोळ वाटत असलेल्या या वादाने काही मिनिटांत हिंसक वळण घेतले. रागाच्या भरात घरातील दोघांनी धारदार चाकून नईम शहा यांच्यावर सपासप वार केले. हा सर्व प्रकार बाजार चौकात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अमरावती हत्याकांडाचा तपास सुरू
या घटनेची माहिती खल्लार पोलीसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे अल्पवयीन असून पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी हत्येसाठी वापरलेला चाकू हा जवळच्या नदीच्या पात्रात फेकून दिला होता. त्यानंतर खल्लार पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवून तो चाकू जप्त करण्यात यश मिळवले आहे .या हत्येमागील नेमके कारण काय आहे? क्षुल्लक वाद नेमका कशावरून झाला होता? याचा अधिक तपास खल्लार पोलीस निरीक्षक करत आहेत