कोची : कोची विमानतळाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ‘मिनी कूपर’ कारने एका स्कूटरला धडक दिल्याने तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर कार चालवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने संतप्त स्थानिकांना सांगितले की, या घटनेचे परिणाम त्याचे वडील सांभाळतील, असा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. हा अपघात रविवार, 11 ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील नेडुंबासेरी भागात घडला. हे तिघेही रात्री उशिरा चहाच्या ब्रेकवरून परतत असताना कारने त्यांच्या स्कूटरला मागून धडक दिली. ‘मिनी कूपर’ कार सुहेल साजीव (वय 19) हा चालवत होता. पोलिसांनी त्याला नंतर ‘सदोष मनुष्यवध’ या आरोपाखाली अटक केली. “माझे वडील सर्व काही सांभाळून घेतील,” असे चालकाने स्थानिक लोकांना सांगितल्याचा आरोप आहे.
अपघातस्थळाजवळच असलेल्या सलीम या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एका मोठ्या आवाजामुळे आसपासचे लोक रस्त्याच्या दिशेने धावले. “अपघात झाला तेव्हा मी जवळच उभा होतो. मोठा आवाज झाला आणि काय झाले आहे हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी धावलो. रस्त्यावर तीन जण जखमी अवस्थेत होते. त्यांना ‘मिनी कूपर’ गाडीने धडक दिली होती,” असे त्याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले. या धडकेत स्कूटरवरील तिघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवालानुसार, धडकेमुळे ते तिघेही रस्त्यावर फेकले गेले. सलीम यांनी सांगितले की, अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी ती कार अडवली आणि चालकाला जाब विचारला. या वादादरम्यान, साजीवने कथितपणे असे म्हटले की त्याचे वडील या परिस्थितीची काळजी घेतील.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात राजकीय खळबळ! ठाकरेंच्या नेत्यासह दोघांना अटक; नक्की घडलं तरी काय?
“लोकांनी त्याला अडवले आणि तिथे काहीसा वाद झाला. चालक म्हणत होता की, त्याचे वडील सर्व काही सांभाळतील. त्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका तिथे पोहोचली. मात्र, रुग्णवाहिका मदतीसाठी आली तेव्हा जखमींची हालचाल थांबली होती,” असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. पोलिसांनी मिनी कूपर चालकाला अटक केली. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल धडकेनंतर स्थानिक रहिवाशांनी साजीवला अडवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम 105 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे कलम ‘हत्या न ठरणाऱ्या सदोष मनुष्यवधा’शी संबंधित आहे.
अपघाताच्या वेळी साजीव मद्यपान करून वाहन चालवत होता का, याचीही तपास अधिकाऱ्यांनी पडताळणी केली आहे. त्यानंतरच्या प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. तर अपघाताच्या नेमक्या परिस्थितीबाबतचा तपास सुरू आहे. तपासाचा एक भाग म्हणून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. प्राणघातक धडक होण्यापूर्वी हे तिघेही जण चहा पिण्यासाठी बाहेर पडले होते. हे तिघेही त्रिक्काकारा येथील एकाच आस्थापनेत कामाला होते. अपघात घडण्यास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा पोलीस तपास करत आहेत.