पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याची बातमी समोर आली आहे. या शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत असून या धोकादायक इमारतीची वेळोवेळी तक्रार करण्यात आली. तरी देखील त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. याविषयी पालकांनी मोठा आक्रोश केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात पिंपळगाव राजा येथील प्राथमिक शाळेची इमारत पूर्णतः जीर्ण झाली आहे. 162 वर्ष जुन्या या पडक्या इमारतीत जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय. यावेळी जिल्हा परिषद प्रशासन एखादा मोठा अपघात व्हायची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांसोबतच त्या प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिसरात राहणारे स्थानिक यांच्या देखील सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. यासंदर्भात प्रशासन काय कारवाई करेल, याकडे पालकांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.