पुणे: खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.पुण्यात पती-पत्नी मिळून दुचाकी चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीच्या प्रत्येक यशात पत्नीचा सहभाग असतो असं म्हणतात, पण या जोडप्याने कुकृत्यातही एकमेकांना साथ दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेतून सुटलेला आणि सध्या तडीपार असलेला सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्याने चक्क पत्नीला सोबत घेऊन वाहन चोरी सुरू केली होती. खडक पोलिसांनी सापळा रचून या दोघांना वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
भवानी पेठेतून चोरी झालेल्या अॅक्टिव्हा दुचाकीच्या तपासात पोलिसांनी जेव्हा सराईत गुन्हेगार वसीम सलिम पटेल (वय 42, रा. कोंढवा) याला ताब्यात घेतले, तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी वसीमने पोलिसांसमोर कबुली दिली की, ही दुचाकी चोरी त्याने एकट्याने नाही, तर त्याच्या पत्नीने आणि त्याने दोघांनी मिळून केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली 70,000/- किंमतीची काळ्या रंगाची अॅक्टिव्हा मोपेड जप्त केली आहे.
या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली असून, पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.