Welding Explosion News : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरातील गजबजलेल्या ढाणकी रस्त्यावर बैलबाजार मैदानासमोर शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एक भयानक दुर्घटना घडली. एका वेल्डिंगच्या दुकानात ट्रॅक्टर आणि गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. या दुहेरी स्फोटाच्या तीव्रतेमुळे 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, मृतदेहांचे अवयव दूरवर उडून पडले आणि संपूर्ण उमरखेड शहर या घटनेने हादरून गेले.
इतर दुकानदारांचा नकार, निष्काळजीपणामुळे घडला अनर्थ
विहिरीतील ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या एका भागाचे वेल्डिंग करण्यासाठी ते वाहन दुकानात आणण्यात आले होते. या कामातील धोका ओळखून परिसरातील इतर 2 ते 3 वेल्डिंग चालकांनी हे काम करण्यास नकार दिला होता. मात्र एका दुकानदाराने हे धोकादायक काम स्वीकारले. ट्रॅक्टरमध्ये स्फोटासाठी लागणाऱ्या जिलेटीन कांड्या होत्या आणि वेल्डिंग करताना उडालेली ठिणगी या स्फोटक साहित्यावर पडल्याने क्षणातच मोठा भडका उडाला.
गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट आणि..
ट्रॅक्टरमधील स्फोटक साहित्याने पेट घेतल्यानंतर शेजारीच असलेल्या गॅस सिलेंडरचाही जोरदार स्फोट झाला. स्फोटात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी झालेल्या 5 जणांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने नांदेड येथील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून ढाणकी रस्ता परिसराला छावणीचे स्वरूप दिले. तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून मृतांची व जखमींची अधिकृत नावे निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
सुरक्षेच्या नियमांचे उघड उल्लंघन
स्फोटक आणि ज्वलनशील साहित्य असताना ट्रॅक्टर वेल्डिंगसाठी आणणे तसेच गॅस सिलेंडरच्या जवळ असे काम करणे यावरून सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. या दुर्घटनेमागे असलेला निष्काळजीपणा आणि बेकायदेशीर कृत्य या दोन्ही बाजूंचा पोलीस आता बारकाईने तपास करत आहेत.
कडक कारवाईची नागरिकांकडून मागणी
स्थानिक पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून घटनेचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निष्काळजीपणामुळे 2 निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याने जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा – Kachiguda Express Fire : प्रवासी साखर झोपेत असतानाच काचीगुडा एक्सप्रेसच्या एसी कोचला आग; असीरगडजवळ खळबळ