दूध गरम करताच वर आला प्लास्टिकसारखा थर! वर्ध्यातील गोरस भंडारचा व्हिडिओ समोर, ग्राहकांमध्ये खळबळ

वर्ध्यातील श्री कृष्णा माई गोरस भंडारमधून खरेदी केलेले दूध गरम करताच त्यावर प्लास्टिकसदृश साय तयार झाल्याचा दावा ग्राहकाने केला आहे.
दूध गरम करताच वर आला प्लास्टिकसारखा थर! वर्ध्यातील गोरस भंडारचा व्हिडिओ समोर, ग्राहकांमध्ये खळबळ

वर्धा: वर्धा शहरातील कारला चौक परिसरात दूध विक्रीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील श्री कृष्णा माई गोरस भंडारमधून खरेदी केलेले दूध गरम करताच त्यावर प्लास्टिकसदृश साय तयार झाल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे दुधाच्या गुणवत्तेचा आणि ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दूध गरम करताच प्लास्टिकसदृश साय तयार

मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने श्री कृष्णा माई गोरस भंडारमधून दूध खरेदी केले होते. घरी दूध गरम करत असताना त्यावर प्लास्टिकसारखा दिसणारा थर तयार झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. यानंतर ग्राहकाने या प्रकाराचा व्हिडिओ चित्रित केला. दुधाच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने संबंधित ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वी FDA ची कारवाई

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच याच गोरस भंडारवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली होती. त्यावेळी तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा दुधाच्या गुणवत्तेबाबत तक्रार झाल्याने संबंधित व्यवसायाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

FDA च्या कारवाईकडे ग्राहकांचे लक्ष

दरम्यान, दूध गरम केल्यानंतर तयार झालेला थर नेमका कशामुळे तयार झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुधात भेसळ आहे की अन्य काही कारणामुळे असा प्रकार घडला, हे प्रयोगशाळेतील तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

श्री कृष्णा माई गोरस भंडारकडे दूध विक्रीचा अधिकृत परवाना आहे का? संबंधित दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार का? तसेच ग्राहकांच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन संबंधितांवर कठोर कारवाई करणार का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता FDA या प्रकरणाची कशी दखल घेते आणि तपासणीत काय निष्पन्न होते, याकडे वर्ध्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version