संभाजीनगर-नागपूर द्रुतगती महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार जवळील तपोवन फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन शिक्षकांचा समावेश आहे. कारंजा नगर परिषदेच्या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आबिद हुसैन आणि शिक्षक नाजिम अहमद नूर अहमद अशी मृतांची नावे आहेत. तर दुसऱ्या दुचाकीवरील लक्ष्मण चव्हाण या व्यक्तीचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.
दोन्ही शिक्षक कार्यालयीन कामानिमित्त वाशिमकडे जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई लगतच्या महामार्गांवर अपघाताच्या घटना घडत असून त्यात या घटनेची भर पडली आहे. मुंबई-गोवा तसेच मुंबई – अहमदाबाद महामार्गावर देखील दुर्घटनेची नोंद याआधी करण्यात आली होती.
मात्र ही संभाजीनगर-नागपूर द्रुतगती महामार्गावरील दुर्घटना कशी झाली व त्या मागचे मूळ कारण अजून देखील स्पष्ट झालेले नाही. तसेच अद्याप मृतांची ओळख पटली असून त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरात मोठा शोक व्यक्त केला जात आहे.